रणवीरसोबत काम करण्यास दीपिकाचा नकार

मुंबई : वृत्तसंस्था – विवाहबंधनात अडकल्यानंतरही दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या जोडीची चर्चा कायम असल्याचे दिसत आहे. दीपिका तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. तर रणवीरच्या सिम्बाला भरघोस यश मिळाले आहे. आता हीच ‘रिअल लाईफ’मधील जोडी डायरेक्टर कबीर खान यांच्या आगामी ‘83’ या चित्रपटात ‘रिल लाईफ’मध्ये दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, दीपिकाने ‘83’ मध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे समजते आहे.
‘83’ हा चित्रपट 1983 साली भारताने जिंकलेल्या क्रिकेट ‘वर्ल्डकप’ स्पर्धेवर आधारित आहे. यामध्ये रणवीर सिंग हा कपिलदेवच्या भूमिकेत दिसणार आहे. असेही समजते की, कपिलदेव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी दीपिकाला ऑफर देण्यात आली होती. मात्र तिने नकार दिल्याचे समोर आले आहे.
कबीर खान यांच्या आगामी ‘83’ या चित्रपटात केवळ केवळ रणवीर आहे म्हणून चित्रपट साईन करण्यास दीपिका इच्छुक नाही असेही समजत आहे. इतकेच नाही तर  दीपिकाला जी भूमिका ऑफर करण्यात आली होती, ती फारच कमी अवधीची आहे, शिवाय या चित्रपटातील भूमिकेत करण्यासारखे काहीच खास नाही असेही दीपिकाला वाटते. समोर आलेल्या माहितीनुसार,  ‘83’ या चित्रपटाची कहाणी तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार कपिलदेव आणि क्रिकेट ‘वर्ल्डकप’वर आधारित आहे.
यापूर्वी दीपिका आणि रणवीरची सोबत भूमिका असलेले अनेक चित्रपट गाजले. यातील  ‘बाजीराव मस्तानी’ व ‘रामलिला’ या चित्रपटात दोहोंच्या भूमिका बरोबरीने होत्या. यामुळेच प्रेक्षकांना हे चित्रपट आवडले होते. परंतु  ‘83’ या चित्रपटाच्या बाबतीत असे काहीच नाही. त्यांचे चाहते ज्यावेळी पैसे खर्च करून तिकीट खरेदी करतील आणि चित्रपट जर त्यांना पसंत पडला नाही, तर ते नाराज होतील. त्यामुळे दीपिकाचा निर्णय योग्यच आहे असे म्हणणेही वावगे ठरणार नाही.