दुबईत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणाची साडेचार लाखांची फसवणूक

मिरज  : पोलीसामा ऑनलाईन

दुबईमध्ये नोकरी लावण्याच्या अमिषाने मिरजेतील एका तरूणास साडे चार लाखांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी मुज्जफर इब्राहिम ओमर (रा. हारकोल मानगाव, रायगड) याच्या विरूद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर सत्तार मोमीन (रा. इदगाह नगर, मिरज) यांनी तक्रार दिली आहे. गेल्या सहा महिन्यामध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

सत्तार याला ‘तुला दुबईमध्ये चांगली नोकरी लावतो’, असे ओमर याने सांगितले. मुज्जफर याने वैद्यकीय तपासणी, व्हिसा, विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे पाहिजेत असे सांगून मोमीन याला बँकेच्या खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानुसार मोमीन यांनी वेळोवेळी मुज्जफरच्या खात्यावर पैसे भरले. सुमारे 4 लाख 49 हजार 900 रूपये भरूनही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याने सत्तार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मुज्जफर याच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.