धावत्या बसमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

दिल्लीः वृत्त संस्था – धावत्या बसमध्ये एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड काढून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा महिलांचा सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

पीडीत महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कॉन्स्टेबल ही जिल्ह्याच्या पीसीआरमध्ये कार्यरत आहे. त्या क्लस्टर बसद्वारे कामावर जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ त्या बसमध्ये एक तरुण चढला आणि तो त्यांच्या मागे येऊन उभा राहिला. त्यानंतर त्याने त्या महिला कॉन्स्टेबलची छेड काढू लागला.

महिलेने त्यास विरोध केला असता त्याने हेल्मेटने मारहाण सुरु केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी बसमध्ये अन्य महिला व पुरुष प्रवाशी देखील होते. परंतु कोणीही मदतीसाठी आले नाहीत. मारहाण करून आरोपी दुसऱ्या बसमध्ये चढून फरार झाला.यानंतर गंभीर जखमी महिलेस उपचारासाठी दीनदयाल उपाध्याय रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा शोध घेत असल्याचे पोलीस उपायुक्त संतोष कुमार मीणा यांनी सांगितले.