अरविंद केजरीवालांनी दिलं PM मोदींना ‘शपथविधी’ कार्यक्रमाचं ‘निमंत्रण’, 16 फेब्रुवारीला होणार ‘समारंभ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल येत्या 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. तसेच प्रचारादरम्यान भाजप नेत्यांकडून अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली. त्यामुळे अरविंद केजरीवाल शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रीत करणार का यावर चर्चांना उधाण आले होते. अखेर या चर्चांना अरविंद केजरीवाल यांनी पूर्णविराम दिला असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीला येण्याचे आमंत्रण दिले आहे.

आम आदमी पक्षाचा दिल्लीत विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे आणि अरविंद केजरीवाल यांचे निवडणुकीत विजय प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन, मी अपेक्षा बाळगतो की दिल्लीच्या जनतेच्या अपेक्षा तूम्ही पूर्ण कराल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केला होता.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या होत्या. या ट्विटला प्रत्युत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, सर आपले धन्यवाद, मी केंद्र सरकारसोबत राहून काम करू इच्छितो. आपल्या राजधानी दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करेन, असे केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संपूर्ण दिल्लीवासीयांना आमंत्रण
दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाने दिल्लीकरांचे आभार मानले आहेत. तसेच येत्या 16 फेब्रुवारी रोजी अरविंद केजरीवाल हे रामलीला मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला संपूर्ण दिल्लीच्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मंत्रीमंडळात कोणताही बदल करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.