भाजप नेत्याचा दावा : ‘ताजमहालचं नाव बदलून राम महल केलं जाईल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह हे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा ते आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. ताजमहालचे नाव बदलून राम महल करण्यात येणार आहे, असा दावा सुरेंद्र सिंह यांनी केला आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. आग्रा येथील ताजमहाल हे शिवकालीन मंदिर होते आणि योगी प्रशासनात लवकरच त्याचे नाव राम महाल असे ठेवण्यात येईल, असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. तसेच सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केलं आहे.

काय म्हणाले सुरेंद्र सिंह
सुरेंद्र सिंह “महाराजांचे वंशज उत्तर प्रदेशच्या भूमीत दाखल झाले आहेत. समर्थ रामदास स्वामींनी ज्याप्रमाणे भारताला छत्रपती शिवाजी महाराज दिले त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशला दिले आहे” असे म्हटले होते. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. त्यांच्यावर पत्रकारांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरेंद्र सिंह यांच्याकडून मुरादाबादमधील पत्रकारांवर झालेल्या कथित हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

“केवळ भारत आणि भारतीयतेचा गौरव करणारेच नेते होतील”
“पत्रकारांवर लाठी वापरणारे समाजवाद्यांचे खरे रूप समोर आले आहे. पण योगीजींच्या राजवटीत हे खपवून घेतले जाणार नाही. देशद्रोही मानसिकता असणार्‍या लोकांना कोणत्याही प्रकारची पसंती दिली जाणार नाही. केवळ भारत आणि भारतीयतेचा गौरव करणारेच नेते होतील” असेदेखील आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले होते. हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असताना मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचे धक्कादायक आणि वादग्रस्त विधान सुरेंद्र सिंह यांनी केले होते.

सुरेंद्र सिंह हे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. “आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत,” असे विधान सुरेंद्र सिंह यांनी केले होते. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते.