केजरीवालांच्या शपथविधी समारंभासाठी अद्यापही अण्णा हजारेंना ‘निमंत्रण’ नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अरविंद केजरीवाल रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. शपथग्रहणाच्या समारोहामध्ये पंंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक प्रतिष्ठित लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे परंतु समाजसेवक अण्णा हजारे यांना अद्याप आमंत्रण मिळाले नाही.

आपल्या पहिल्या कार्यकाळात अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांना शपथग्रहण समारोहात आमंत्रित केले होते. परंतु आजारपणाचे कारण देऊन अण्णा हजारे उपस्थित राहिले नव्हते. सूत्रांनुसार केजरीवाल यांनी अण्णांना संपर्क साधण्यास सांगितले परंतु त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.

तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या शपथेसंबंधित अण्णा हजारे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांना कोणतेही निमंत्रण देण्यात आलेले नाही. निर्भया प्रकरणी दोषींना फाशी देण्यास उशीर होत असल्याने त्यांनी 20 डिसेंबरपासून मौनव्रत धारण केले आहे. दोषींना फाशी देण्यात आल्यानंतर ते आपले मौनव्रत सोडतील. अण्णा यांचे सचिव म्हणाले की जेव्हा ते काही बोलू इच्छितात तेव्हा ते कागदावर लिहून देतात.

अण्णा हजारेंनी केजरीवाल यांच्या विजयाबाबत सांगताना ‘ठीक आहे’ असे लिहिले. सचिवांनी जेव्हा त्यांना विचारले की मीडियाला तुमची प्रतिक्रिया हवी आहे, तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अण्णांना निमंत्रण न दिल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.