AAP ला सोडचिठ्ठी देत NCP कडून लढलेल्या उमेदवाराला मिळाली ‘एवढी’ मतं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले असून यामध्ये दिल्लीवासीयांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्याकडे सत्ता सोपविली आहे. ७० पैकी ६३ जागांवर आपच्या बाजी मारली असून अवघ्या ७ जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले आहे. त्यात या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत ५ उमेदवार उतरवले होते. मात्र, त्यांनाही पराभव पत्करावा लागला.

दरम्यान निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने फतेह सिंह, सुरेंदर सिंह यांना तिकीट नाकारत सुरेंद्र कुमार यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे या दोघांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ‘दिल्ली अभी दूर नही’ अशा शब्दात या नेत्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तिकिटावर सुरेंदर सिंह यांनी दिल्ली कॅन्टोंमेंट मतदारसंघातून निवडणूक लढविली. गोकळपूर मतदारसंघातून फतेह सिंह यांना उमेदवारी देण्यात आली.

यावेळी आपचे विरेंदर सिंह काडियान यांना २८ हजारांपेक्षा जास्त मतदान झालं तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेंदर सिंह यांना केवळ ९०४ मते पडली. तर दुसरीकडे फतेह सिंग यांना ४१९ मते पडली तर याठिकाणी आपचे उमेदवार सुरेंद्र कुमार यांना ८८ हजार मते मिळून विजयी झाले. बाबलपूर येथे राष्ट्रवादीचे उमेदवार झाहिद अली यांना १०० मते, छत्तरपूर येथे राष्ट्रवादीचे राणा सुजीत सिंह १७१ मते, मुस्तफाबाद येथील उमेदवार मयूर भान यांना २८८ मते पडली आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार म्हणाले कि, ‘या निकालात काहीही आश्चर्य नाही. लोकांनी विकासाला मत दिले आहे. मात्र दिल्लीचा निर्णय हा दिल्लीपुरता नसून हे इतर राज्यांमध्येही होऊ शकते. धार्मिक प्रचाराला ठोकारलं आहे, ही अहंकाराला चपराक आहे. ही प्रक्रिया आता सुरु झाली असून अनेक राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. तसेच, आता आम्ही उर्वरित पक्षांनी एकत्र बसून काम करायला हवे. आज लोकांना एका विचाराच्या अपेक्षा आहे असं सांगतानाच ‘भाजप देशावरची ही आपत्ती असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.