दिल्ली पोलिसांचा ‘लाव रे तो व्हिडीओ, माध्यमांसमोर दाखवले शेतकरी नेत्याचे प्रक्षोभक भाषण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी (दि. 26) शेतक-यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात तब्बल 300 पोलीस जखमी झाले. आता या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी बुधवारी (दि. 27) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काही शेतकरी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त एसएन श्रीवास्तव यांनी काही व्हिडीओ शेअर करत शेतकरी नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केल्यामुळे आंदोलक भडकल्याचा आरोप केला आहे. सतनाम पन्नू यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे शेतकरी भडकले. असे सांगत श्रीवास्तव यांनी शेतकरी नेत्यांनी केलेल्या काही प्रक्षोभक व्हिडीओ शेअर केले. राकेश टिकेत यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनीही हिंसाचार केल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच लाल किल्ला परिसरात झालेल्या हिंसाचाराला आम्ही गांभीर्याने घेतल्याचे त्यांनी सांगितले. लाल किल्ल्यावर हिंसाचार करणाऱ्यांचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. त्यांची ओळख पटवली जात आहे. त्यांना अटक करून पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पोलीस आयुक्त श्रीवास्तव म्हणाले की, 25 जानेवारीला शेतकरी नेत्यांनी दिलेला शब्द मोडला. 26 जानेवारी रोजी सकाळीच आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्यास सुरुवात केली. आंदोलकांना रोखण्यासाठी आमच्यासमोर अनेक पर्याय होते. मात्र आम्ही संयमाचा मार्ग पत्करला. आम्हाला जीवितहानी टाळायची होती. त्यामुळे आम्ही अश्रुधुराचा मारा केला, असे श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.