सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांसाठी खुशखबर ! अभिनेत्याच्या नावानं ओळखला जाणार दिल्लीतील ‘हा’ रस्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची गुरुवारी (दि 21 जानेवारी) 35 वी बर्थ ॲनिव्हर्सरी होती. या निमित्तानं अनेकांनी पोस्ट शेअर करत सुशांतची आठवण काढली. आता सुशांतच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दिल्लीतील एका रस्त्याचं नाव हे सुशांतच्या नावावरून स्वर्गीय सुशांत सिंह राजपूत मार्ग ठेवलं जात आहे. नवी दिल्लीच्या एंड्र्युज गंज भागातील एका रस्त्याचं नामकरण करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. दक्षिण दिल्ली नगर निगमचे काँग्रेसचे नगरसेवक अभिषेक दत्त यांनी गुरुवारी दिवंगत अभिनेत्याच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त ही माहिती दिली आहे.

बिहारच्या लोकांनी केली होती मागणी
दत्त यांनी सांगितलं की, 6 महिन्यांपूर्वी मला एंड्र्युज गंज भागात सुशांत सिंह राजपूतच्या नावावर एका रस्त्याचं नामकरण करण्याची विनंती मिळाली होती. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आम्ही लवकरच या गल्लीचं उद्घाटन करू आपण त्यांना हा सन्मान देणं गरजेचं आहे. कारण ते याचे दावेदार आहेत.

अभिषेक दत्त म्हणाले…
समितीला दिलेल्या प्रस्तावात आपला प्रस्तावात मांडत अभिषेक दत्त म्हणाले, सुशांत एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला. नंतर त्यानं देशभरात नाव कमावलं. रस्ता नंबर 8 च्या आसापास राहणाऱ्या लोकांमध्ये जास्त करून बिहारचे लोक आहेत. त्यांनी मागणी केली होती की, एंड्रयुज गंज ते इंदिरा कॅम्प जाणाऱ्या रस्त्याला दिवंगत ॲक्टर सुशांतचं नाव दिलं जावं. अखेर त्यांची मागणी मान्य झाली.