तालुकाबंदी करुन ग्रीन झोन मध्ये समावेश करा : चेतनसिंह पवार

मुरबाड  : पोलीसनामा ऑनलाइन –  तालुकाबंदी करुन मुरबाड तालुका ग्रीन झोन मध्ये समावेश करावा अशा आशयाचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी डाॅ. शिवाजी पाटील यांच्याकडे पर्यावरण काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वामध्ये देण्यात आले. मुरबाड तालुक्यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही आहे व क्वारंटाईन केलेल्या रुग्णाची संख्या देखील अत्यल्प आहे तसेच तालुक्यातील नागरिकांनी सरकारने घालुन दिलेल्या नियमाप्रमाणे कोरोना विरूध्द लढा चांगल्यापध्दतीने सुरू ठेवलेला आहे.

मुरबाड तालुक्यामध्ये विशेष करुन शेतकरी, MIDC कामगार, आदिवासी, शेतमजुर, लहान व मध्यम व्यापारी यांची जास्त संख्या असलेला तालुका आहे परंतु सदरच्या परिस्थितीमुळे वरील सर्व वर्गांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गाडा चालण्यासाठी व तालुक्यातील नागरिकांवर उपासमारीची वेळ येवु नये म्हणुन आपण विशेष प्रयत्न करुन तालुकाबंदी करुन मुरबाड तालुक्याचा समावेश ग्रीन झोन मध्ये करुन घ्यावा.

तालुक्यातील MIDC संपुर्ण सुरू करावी, शेती विषयक कामे आणि सर्व व्यापाऱ्यांची दुकाने सुरू करुन सर्व बाजारपेठा सुरू कराव्यात त्यामुळे तालुक्याची अर्थव्यवस्था सुरळीत होईल इतर ग्रीन झोनमधील सर्व शिथिलता लागु कराव्यात असे प्रतिपादन इंजि. चेतनसिंह पवार यांनी केले. ग्रीन झोन मध्ये समावेश करावा ह्या मागणीचा योग्य पध्दती विचारविनिमय करुन अमलात आणण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन निवासी जिल्हाधिकारी यांनी दिले.