बारामतीतील व्यापारी प्रीतम शहांनी केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिली राष्ट्रवादी नेत्यांची नावंं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी राहणा-या एका व्यापा-याने सावकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक बढ्या नेत्याची नावे असल्याने मोठी खळबळ (deputy-cm-ajit-pawar-neighbor-commits-suicide-names-ncp-leaders-were-written-suicide-note) माजली आहे.

या प्रकरणी सावकारीच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहित केल्याप्रकरणी बारामती पोलिसांनी राष्ट्रवादी नगरसेवकासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या 9 पैकी 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, अद्याप 3 जण पसार आहेत.

प्रीतम शहा असे आत्महत्या केलेल्या व्यापा-याचे नाव आहे. या प्रकरणी मृत व्यापा-याच्या मुलाने बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींनी प्रीतम शहा यांना 30 टक्के व्याजदराने पैसे दिले होते. शहा यांनी घेतलेले पैसे परतही केले होते.परंतु जादा रक्कम वसुली करण्यासाठी आरोपींनी शहा यांच्या मागे तगादा लावला होता. त्यामुळे कंटाळून शहा यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम शहा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. यात अवैध सावकारीवरून काहीजण पैशांसाठी आपला छळ करत होते. त्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे शहा यांनी लिहिल्याचे आढळले आहे. प्रीतम शहा यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नगरसेवक जयसिंह अशोक देशमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रवीण गालिंदे, हनुमंत गवळी, सनी ऊर्फ सुनील आवळे, संघर्ष गव्हाले, मंगेश आमसे यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. यातील एकजण बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहेत, बहुतांश आरोपी राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. आरोपींमध्ये बारामतीचे नगरसेवक, बारामती सहकारी बँकेच्या संचालकांचा समावेश आहे.

…तोच निकष लावणे झेपेल काय?
दरम्यान, या प्रकरणावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जो निकष लावून अर्णब गोस्वामी यांना अटक केली, तोच निकष लावून आता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करा, झेपेल काय? असा सवाल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.