Pune News : ZP मधील अंतर्गत वादाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा परिषदेतील विकासकामांच्या नियमबाह्य याद्यांची आणि पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजीची जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली. या नियमबाह्य कामांमुळे अजित पवार यांनी झेडपीचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. या कानउघाडणीनंतर झालं गेलं विसरा अन किमान यापुढे तरी जरा समजून-उमजून नियमाने कामे करा, असा सल्लाही अजित पवार यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिला.

पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हि कानउघाडणी केली. या बैठकीत पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या एका अभ्यासू कार्यकर्त्याचे उदाहरणसुद्धा पदाधिकाऱ्यांना दिले. विकासकामांच्या याद्या तयार करताना जिल्हा नियोजन अधिकाऱ्याने जिल्हा परिषदेला कल्पनाच दिली नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून काही पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यातूनच पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू झाल्याची चर्चा रंगली. त्यामध्येच कामाचे श्रेय स्वतःकडे घेण्यासाठी सातत्याने आटापिटा करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नवीन कामकाजपद्धतीची भर पडली. यामुळे पदाधिकाऱ्यांनी त्या संबधीत अधिकाऱ्याविरुद्ध व त्या पदाधिकाऱ्याच्या कामकाजपद्धतीबाबत पालकमंत्री पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.