लाचखोर उपसंचालकासह चौघांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व इतर दोघांना ५ लाख रुपयांची लाचप्रकरणी ‘एसीबी’ने अटक केली होती. पाच दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या चौघांचीही कोठडी न्यायालयाने आणखी तीन दिवस वाढवली आहे.

अटक केलेल्यांमध्ये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिकचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे, विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे (रा. वसंत विहार, फ्लॅट नं. १३, पाचवा मजला, बडदेनगर, शिवाजी चौक, सिडको, नाशिक), खाजगी इसम सचिन उत्तमराव महाजन (वय ३३ वर्ष, धंदा खाजगी वालक, रा. वसंत विहार, फ्लॅट नं. ११, चौथा मजला, बडदेनगर, शिवाजी चौक, सिडको, नाशिक), मच्छिंद्र मारुती गायकवाड (वय ४८ वर्ष, धंदा. नोकरी, लॅब बॉय, वर्ग ४, गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर, रा. शिवाजीनगर, नवनागापूर, एम.आय.डी.सी.) यांचा समावेश आहे.

तक्रारदार यांना प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे अनुसचित जमाती प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी म्हणून शिर्डी येथे लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान उपसंचालक रामचंद्र सोनकवडे यांचे उपस्थितीत विधी अधिकारी शिवप्रसाद काकडे, विनायक उर्फ सचिन उत्तमराव महाजन, मच्छिंद्र मारुती गायकवाड यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपये लाचेची मागणी केली. ती लाचेची रक्कम उपसंचालक व विधी अधिकारी यांच्यावतीने विनायक महाजन व मच्छिंद्र गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष मध्यरात्री एक वाजता शिर्डी येथील हॉटेल साई आसरा समोर स्वीकारली होती.

याप्रकरणी चौघांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना गुरूवारी पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने सखोल तपासासाठी चौघांच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे. 11 सप्टेंबरपर्यंत ते पोलीस कोठडीत राहतील.

 

You might also like