कोरोनाने नायब तहसीलदारांचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नायब तहसीलदार अशोक सलामे (वय 54) यांचा कोरोनाने रविवारी (दि. 18) उपचारादरम्यान मृत्यू झाला. सलामे यांना काही दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वरोरा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत होते.

गेल्या काही दिवसांपासून वरोरा तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीत. दरम्यान येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाली होती. अशातच नायब तहसिलदार अशोक सलामे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला.