सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकणात ED नं लक्ष घालण्याची देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला महिना उलटून गेल्यानंतरही या प्रकरणात रोज एक नवीन ट्विस्ट येताना पहायला मिळत आहे. आता सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे. भाजपच्या आमदारानं थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून या आत्महत्येचा तपास सीबीआयनं करावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे.

 

सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणात आता देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी असं व्यापक जनमत आहे. पण राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी ईसाआयआर दाखल करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लँड्रिंग असल्याचे आढळून आल्याने याबाबत ईडीने चौकशी करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तर दुसरीकडे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी असा आरोप केला आहे की, या प्रकरणात राज्यातील एका युवा मंत्र्यांचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास निष्पक्ष नाही. दरम्यान, हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही बिहार पोलीस केवळ प्राथमिक चौकशीसाठी आले होते, मुंबई पोलीस चांगल्याप्रकारे तपास करत असून सीबीआयकडे तपास देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे देखील मागील अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करत आहेत. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून त्याचा खून का झाला असावा याबाबत 26 मुद्दे मांडले आहेत. पंतप्रधानांना पत्र लिहण्यापासून ते या प्रकरणातील गोष्टींची सत्यता पडताळण्यासाठी वकील नेमण्यापर्यंत सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या आत्महत्येचा छडा लावण्यासाठी विशेष जोर दिला आहे.