धोबी, परीट समाजाच्या अनुसूचित जातींमधील सहभागावरून फडणवीसांचा ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धोबी आणि परीट समाजाला अनुसूचित जातींमधील सहभागावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटले की धोबी आणि परीट समाजाला अनसूचित जातींमध्ये समाविष्ट न करण्यासाठी मंत्रालयातील काही शासकीय अधिकाऱ्यांनी आणि माजी मंत्र्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न भाजप सरकारने हाणून पाडल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ते आझाद मैदान येथे श्री. संत गाडगे महाराज जयंती समारोह कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते.

आझाद मैदान येथे राष्ट्रीय रजक महासंघाच्या वतीने श्री. संत गाडगे महाराज जयंती समारोह तसेच समाज बांधव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोप प्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आम्ही सगळे गाडगेबाबा यांच्या विचारावर काम करणारी माणसं आहोत. पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले. मात्र, याचे उगमस्थान हे गाडगे बाबा आहेत. गाडगेबाबा यांच्या विचारावर देशाचे सरकार चालत आहे. धोबी – परीट समाजावर अन्याय झालेला आहे. अनुसूचित जातींमध्ये त्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे. अनुसूचित जातींमध्ये समावेश व्हावा यासाठी मागील वीस वर्षापासून आंदोलन सुरु आहे. बार्टीचा अहवाल तयार झाला, तो चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

धोबी – परीट समाज्याला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट केलं जाऊ नये यासाठी मंत्रालयातील काही उच्चस्तरीय अधिकारी आणि माजी मंत्र्यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, त्यांचे प्रयत्न भाजपने हाणून पाडले. आम्ही भांडे समितीचा अहवाल लागू करण्याचे प्रयत्न केले. आम्ही हा अहवाल केंद्राला पाठवला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.