Devendra Fadnavis | नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

 

पानी फाऊंडेशनतर्फे (Paani Foundation) शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२’च्या (Satyamev Jayate Farmer Cup) पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक चित्रपट अभिनेते आमीर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao), पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ (Satyajit Bhatkal), प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ (Dr Avinash Pol) आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरण बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल. उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारावा लागेल. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो.

रासायनिक खतामुळे जमिनीची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आणि अधिक उत्पादन देण्याची शक्ती संपुष्टात आली. दुसरीकडे राज्यात कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. म्हणून आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. महाराष्ट्रात विषमुक्त नैसर्गिक शेतीचे मिशन सुरू केले आहे. ३ हजार कोटी रुपये खर्च करून २५ लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीकडे वळविण्यात येणार आहे. यामुळे शेतीची उत्पादकता वाढेल. नैसर्गिक शेतीत देशी गायींचा मोठा वाटा असल्याने या संदर्भातील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येईल.

 

शेतकरी केंद्रबिंदू असलेला अर्थसंकल्प
नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला केंद्रबिंदु ठेवून अनेक योजना सादर केल्या आहेत. जलयुक्त शिवार २.० तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या ६ हजार रुपयांसोबत राज्य शासनही १ कोटी १२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ६ हजार रुपये टाकणार आहे.

 

शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. केवळ १ रुपये भरून त्यांना विम्याची नोंदणी करता येणार आहे. शेतकऱ्यांना थोडी मदत केली तर ते चांगली प्रगती करू शकतात. म्हणून शेततळे, शेड नेट, पेरणी यंत्र, विविध साधने आणि इतर कृषि निविष्ठा देण्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

 

पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली
आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनची कल्पना मांडून शेतीच्या क्षेत्रात क्रांती आणली असे नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पा फाऊंडेशनने जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याच्या कार्यात सातत्य दाखवले आहे. त्यांनी वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार करणे, विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांचे गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक कशी करता येईल याचे सुंदर मॉडेल तयार केले आहे. फार्मर कपमध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा प्रशिक्षक म्हणून इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी उपयोग होईल.

जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांची योजना
शासनाने जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. जलयुक्त शिवार शेतकऱ्यांची योजना होती. २० हजार गावात ६ लाख स्ट्रक्चर तयार होऊन जलस्वयंपूर्ण गावे झाली. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यालाच जोड म्हणून वॉटर कपने शेतकऱ्यांना जलसंधारणासाठी प्रेरित केले. निसर्गाच्या फेऱ्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये असलेल्या क्षमतेची आठवण करून देण्याचे कार्य वॉटर कपने केले आणि ग्रामीण भागातील अनेक गावे जलस्वयंपूर्ण झाली.

 

शासनाने शेतकऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण सुरू केले आहे. कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून मागील काळात अडीच लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते आणि गटांच्या संचलनाचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. येत्या काळात मोठ्या प्रमाणात हे प्रशिक्षण देण्यात येईल.

 

सोलर फिडरद्वारे शेतकऱ्यांना १२ तास वीज
दिवसा १२ तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. यासाठी ॲग्रीकल्चर फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील.
यावर्षी ३० टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. पुढील दोन वर्षात उर्वरित फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील आणि शेतीसाठी दिवसा १२ तास वीज मिळू शकेल.
यासाठी सरकारी पडीक जमिनीचा उपयोग करण्यात येईल. त्यासोबत फिडरजवळ असलेल्या शेतात काही पिकत
नसेल तर अशी शेतजमीन सोलरसाठी ३० वर्षे भाड्याने घेण्यास शासन तयार आहे.
या जमिनीची मालकी शेतकऱ्याची असेल. ३० वर्षानंतर शेतकऱ्याला जमीन परत दिली जाईल. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळू शकेल.

शेतकऱ्यांनी करून दाखविले
गेली तीन वर्षे अतिवृष्टीचा सामना केल्यानंतर हे वर्ष अल निनोचे असल्याने पाऊस कमी होऊ शकतो.
म्हणून ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी, जलसमृद्ध गावातील जुन्या स्ट्रक्चरची दुरुस्ती करावी.
बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम करावे. कमी पाऊस झाला तरी संरक्षित सिंचन करता येईल अशी तयारी करावी.
संकटावर एकत्रितपणे मात करता येते हे शेतकऱ्यांनी हे करून दाखविले आहे.
तुमची कथा सांगितली, तुम्ही केलेले परिवर्तन दाखविले तर निराशेतील शेतकरी पुन्हा उभा राहील आणि हे करण्याकरिता शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील,
असे फडणवीस यांनी सांगितले. पानी फाऊंडेशनने ४ लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे उद्दीष्ट ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

 

आमिर खान म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानी फाऊंडेशनच्या प्रवासात नेहमीच सहकार्य केले.
त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले.
शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात. वैज्ञानिक आणि संशोधकांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करून पुढे जावे.
येत्या काळात महाराष्ट्रात आणि भारतात हजारो कृषि उद्योजक तयार व्हावेत.
शेतीला व्यवसायाच्यादृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे, यातील समस्यांवर मात करून पुढे जावे, असे त्यांनी सांगितले.

 

भटकळ आणि पोळ यांनी पानी फाऊंडेशनची माहिती दिली.
कोविड संकटाच्या काळातही ग्रामस्थांनी जलसंधारणाची चळवळ सामूहिक प्रयत्नातून पुढे नेली असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कृषि क्षेत्रातील संशोधानाचे महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे
कुलगुरू डॉ.शरद गडाख, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण,
सह्याद्री फार्मसीचे विलास शिंदे, विविध पिकांसाठी डिजिटल शेती शाळेचे मार्गदर्शक, विविध पिकांसाठी एसओपी देणारे मार्गदर्शक,
कृषि विषयक माहितीपट पडताळणी करणारे तज्ज्ञ, पोकरा प्रकल्पाचे विजय कुवळेकर, एबीपी माझाचे राजीव खांडेकर,
पानी फाऊंडेशनला सहकार्य करणाऱ्या संस्था, शेतकऱ्यांसाठी महितीपट निर्मितीत सहकार्य करणारे, कृषि तज्ज्ञ आदींचा सन्मान करण्यात आला.

 

यावेळी ध्वनीचित्रफीत आणि शाहीर अवधूत गांधी, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांच्या पथकाने सादर केलेल्या
नृत्याविष्काराच्या माध्यमातून पानी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देण्यात आली.

 

Web Title :- Devendra Fadnavis | Farmers will be enriched through natural and group farming – Deputy Chief Minister Devendra Fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ileana D’Cruz | इलियाना डिक्रुझला तमिळ सिनेसृष्टीतून केलं बॅन? समोर आले ‘हे’ कारण

Mango Eating Tips | आंबे खाण्यापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा फायद्यांऐवजी होऊ शकते नुकसान

Kamlakar Nadkarni Passed Away | ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि लेखक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन