फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील : जयंत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीला राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भरघोस यश संपादन केलं. जयंत पाटील यांनी यावेळी विजय उमेदवारांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन देखील केलं. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वगैरेच्या वल्गना केल्या जात होत्या. तीन चाकी सरकार असं हिणवलं जात होतं. पण महाविकास आघाडीची ताकद या निवडणुकीत भाजपला लक्षात आली असेल. फडणवीसांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव होईल इतकी भक्कम आघाडी आमची आहे”, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध करून दाखवलं आहे. या निकालाने दाखवून दिले आहे की महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील तसंच मित्र पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व महाराष्ट्रातील जनतेचे विनम्र आभार, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला
आमचा का पराभव झाला याचं आत्मचिंतन करुच, पण राज्यात ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यांनीही याचं आत्मचिंतन करावं.