तासगाव कोल्डस्टोअरेज आगीबाबत तासगाव तालुक्यात उलट सुलट चर्चा

तासगाव : पाेलीसनामा ऑनलाईन- तालुक्यात तीसहून अधिक असणार्‍या बेदाणा शीतगृहांच्या सुरक्षीततेसंदर्भात अनेक उद्योजकांना नियम धाब्यावर बसवले आहेत. यामुळे वारंवार शीतगृहांना शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा वर्षात सात ते आठ शीतगृहांना आगी लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर याबाबत उद्योजकांनी काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.

तासगाव – सांगली रस्ता येथील श्री सिध्दनाथ शीतगृहाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यावेळी त्याठिकाणी पाच किलोच्या सिलेंडर व्यतिरीक्त आग विझवण्यासाठी काहीही उपाययोजना नव्हत्या. तर शीतगृह तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे डांबर, थर्माकोल, लाकडी पट्ट्या, ऑईल हे सर्वच ज्वलनशील आहे. शिवाय शीतगृहामधील गॅसही त्वरीत पेट घेणारा असतो.

यासाठी याठिकाणी पाण्याच्या पाईपचे फिटींग करणे, सर्व चेंबरमध्ये त्याच्या जोडण्या देणे गरजेचे असते, मात्र तासगाव तालुक्यातील अनेक शीतगृहांमध्ये अशा उपाययोजना दिसून येत नाहीत. सिध्दनाथ शीतगृहामध्येही या उपाययोजना नसल्यानेही ही आग लागल्याचे सिध्द झाले आहे.

दरम्यान शीतगृह उद्योजकांनी याबाबत योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. शीतगृहांचा विमा जरी उतरवला असला तरी त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या बेदाण्याचा विमाही असणे गरजेचे करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळता येणार आहे.

दरम्यान याबाबत काही व्यापार्‍यांकडून असे सांगण्यात आले की, व्यापार्‍याला धंद्यात नुकसान झाल्यास किंवा कर्ज झाल्यास काही व्यापारी विम्याचा फायदा घेण्यासाठी अशा प्रकारे कृत्रीम शॉर्टसर्किट करुन शीतगृहाला आग लावतात. यावेळी शीतगृहातील चांगला बेदाणा काढून त्याठिकाणी खराब बेदाणा ठेवला जातो.

त्यामुळे विमा कंपनीकडून झालेल्या नुकसानीपेक्षा जास्त पैसे मिळतात. असे प्रकार सध्या वाढत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात काही वेळेस खरच जर आग लागली असेल तर त्या व्यापार्‍याला मात्र अशा प्रकरणांचा सामना करावा लागतो. अनेक शेतकऱ्यांच्या बेदाना शितगृहात होता त्यावेळी सर्व शेतकरी यांनी धाव घेतली व शितगृह मालकाला विचारले आमच्या मालाचे करायचे काय तर त्यांनी उत्तर दिले, तुमच्या मालावर विमा आहे विमा कंपनी नुकन भरपाई देइल, आगी विषयी तासगाव तालुक्यात उलट सुलट चर्चा मात्र चालु आहे.