२६ वर्षानंतर ‘हा’ नेता उतरणार लोकसभेच्या रणांगणात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या वक्तव्याने सातत्याने टिकेचा सामना करावा लागणारे नेते अशी प्रतिमा असलेले दिग्विजय सिंह आता तब्बल २६ वर्षानंतर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. ज्या जागेवर गेल्या ३० वर्षात भाजप कधीही पराभूत झाली नाही अशा भोपाळ लोकसभा मतदारसंघातून ते उभे राहणार आहेत. काँग्रेसने शनिवारी रात्री त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ७२ वर्षाच्या दिग्विजय सिंह यांनी २००३ मध्ये विधानसभेची निवडणुक लढविली होत. तर १९९१ मध्ये लोकसभेची निवडणुक लढविली होती. त्यानंतर आता ते प्रथमच निवडणुक लढविणार आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिग्विजय सिंह यांना निवडणुक लढविण्याची विनंती केली. त्यांना तीन जागा सुचविल्या. तेव्हा दिग्विजय सिंह यांनी तुम्ही सांगाल, तेथून निवडणुक लढवितो, असे कळविले. त्यानंतर त्यांना भोपाळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले व विद्यमान राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह १९९३ ते २००३ मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९७७ साली ते प्रथम आमदार बनले. १९८४ ते १९८७ मध्ये ते प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख होते. १९८४ व १९९१ मध्ये ते राजगढ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. १९९३ मध्ये ते मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी खासदार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ते प्रथमच लोकसभा निवडणुक लढवणार आहेत. दिग्विजय सिंह हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर हिंदूवादी संघटनांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांकडून ते नेहमीच ट्रोल होताना दिसतात. त्यांनी गेल्या वर्षी आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीशी केलेल्या लग्नामुळे ते चर्चेत आले होते. विठ्ठलावर त्यांची निस्सीम भक्ती आहे. दर वर्षी ते आषाढी एकादशीला पंढरपूरच्या महापूजेला उपस्थित असतात.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या उमा भारती आणि कैलाश जोशी यांनी नेतृत्व केलेल्या भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्या उमेदवारीने चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.