निराशाजनक अर्थसंकल्प – रमेश बागवे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या पाच वर्षात कोणतीही भरीव कामगिरी केलेली नाही. त्याचेच प्रतिबिंब केंद्राच्या अंतरिम अंदाजपत्रकात पडले आहे. अशी प्रतिक्रिया पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणि अन्न सुरक्षा या काँग्रेसच्या योजनांनाच मोदी सरकारला उचलून धरावे लागत आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गरीबांसाठी किमान उत्पन्न हमी योजनेचे सूतोवाच केले. त्यामुळेच या अंदाजपत्रकात दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची तरतूद मोदी सरकारला करावी लागली हा काँग्रेस पक्षाचाच नैतिक विजय आहे.

आगामी लोकसभा निवडणुका समोर ठेवून मध्यमवर्गीयांना काही किरकोळ सवलती देण्याचा प्रयत्न दिसून येतो. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत देशाने जी झेप घेतली होती त्याचा या अंतरिम अर्थसंकल्पात अभाव दिसतो असेही बागवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

या अर्थसंकल्पात गुंतवणूक वाढ, मोठ्या प्रमाणावर तरुणांसाठी रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागात शेती क्षेत्रावर असणारा कर्जाचा डोंगर याबाबत कोणतेही भरीव धोरण नाही. कोणतीही नवी दिशा आणि नवे धोरण अंतरिम अंदाजपत्रकात दिसत नाही. देशाच्या दृष्टीकोनातून ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल.