सातारा सीमेवर ऑक्सिजन टँकर अडवला, ‘ऑक्सिजन’साठी कोल्हापूर-सातारा जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन  –   देशात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यातच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा तुटवडा जणवत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, शहर प्रशासन ऑक्सिजन मिळवण्यासाठी धावाधाव करताना दिसत आहे. अशीच एक घटना सातारा जिल्ह्याच्या सीमेवर घडली आहे. सातारा सीमेवर अडवण्यात आलेल्या ऑक्सिजन टँकरवर सातारा आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हक्क सांगितला. यावरुन दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने ऑक्सिजनला मागणी वाढली आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरुन जाणारा एक ऑक्सिजनचा टँकर अडवला. यावरुन सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकार आमने-सामने आले. दोघांनी हा टँकर आमचा असल्याचा दावा केला. टँकरवरुन दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सध्या हा टँकर पोलीस बंदोबस्तात उभा आहे. हा प्रकार सातारा जिल्ह्याच्या सीमेवर घडला असून दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची उच्च पातळीवर चर्चा झाली.

तो टँकर सातारा जिल्ह्याचाच

ऑक्सिजनच्या टँकरवरुन सातारा आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्यात वाद सुरु झाल्यानंतर फोनाफोनी झाली. यामध्ये हा टँकर सातार जिल्ह्याचा असल्याचे स्पष्ट झाले. एकाच वेळी दोन टँकर निघाल्याने आणि एका टँकरचा संपर्क तुटल्याने हा गोंधळ झाला, अशी माहिती सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगतली. तर संबंधित टँकरचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशी काही संबंध नाही. तो टँकर कोल्हापुर मधील प्रायव्हेट उत्पादकाचा आहे. त्यातील ऑक्सिजन कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी टीएनएस कंपनीकडून स्वतंत्र टँकर पाठवण्यात आला असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी सांगितली.