बेबी पेंग्विनवर महापालिका काढणार माहितीपट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

परदेशी पाहुण्याच्या जन्माचे साक्षीदार असलेले भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई प्राणिसंग्रहालय संपूर्ण देशात एकमेव ठरले आहे. त्यामुळे हा क्षण अजरामर बनविण्यासाठी आता पेंग्विनच्या जन्मावर एक माहितीपट काढण्याचा राणीबागेतील अधिकाऱ्याचा विचार आहे. तसेच संशोधनासाठी पेंग्विनच्या अंड्याचे कवचही जतन करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B077J5TTN7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’309d5b6d-a375-11e8-93a7-a57ea076fdcd’]

राणीच्या बागेत स्वातंत्र्य दिनी रात्री जन्माला आलेले नवजात पेंग्विन संपूर्ण देशाचे आकर्षण ठरत आहे. या परदेशी पाहुण्याच्या जन्माची कथा मुंबईकरांना पाहता यावी, यासाठी राणीबागेतील पेंग्विन कक्षात असलेले सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करण्यात येत आहे. त्यानंतर या सीसीटीव्हीच्या आधारे या नव्या पाहुण्याचा माहितीपट तयार होऊ शकेल. त्याचबरोबर ज्या अंड्यातून हे पिल्लू बाहेर आले, त्याचा अभ्यासही करण्यात येत असून, हे कवच नागरिकांनाही पाहता येणार आहे. गेल्या वर्षी राणीच्या बागेतील पेंग्विनचे आगमन, परदेशात आपले घर तयार करण्यासाठी वातावरणाशी जुळून घेण्याची त्यांची धावपळ, त्यांनी निवडलेले जोडीदार असे सर्व चित्रीकरण संशोधनासाठी उपलब्ध होऊ शकते.

गेल्या वर्षी दीड वर्षाच्या मादी पेंग्विनच्या मृत्यूनंतर राणीबागेतील कर्मचाºयांवर टीकेची झोड उठली होती. मात्र, राणीबागेतील कर्मचाऱ्यांनी या पेंग्विनसाठी घेतलेली मेहनत संपूर्ण जगासमोर यावी, यासाठी हा माहितीपट काढावा, असे काही अधिकाऱ्यांना वाटते.

अवघ्या चार दिवसांच्या बेबी पेंग्विनला पाहण्यासाठी बच्चेकंपनीची झुंबड उडत आहे. मात्र, सध्या या पिल्लाला आईवडिलांची ऊब हवी असून ते स्वत: अन्न खाण्यास शिकल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी मुंबईकरांना त्याला पाहता येणार आहे.

जन्माला आल्यानंतर ७५ ग्रॅम असलेल्या या पिल्लाचे वजन हळूहळू वाढत आहे. त्याची प्रकृती व त्याची वाढ यावर राणीबागेतील पशू वैद्यकीय अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत. सध्या हे पिल्लू करड्या रंगाचे आहे. दोन वर्षांत त्यात बरेच बदल होतील.