नेत्यांचे राजकारण नको तर जनतेला दिलासा हवाय !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती बिकट झाली असून यामध्येच सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस भिडत आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांना आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत आणि दुसरीकडे राजकारणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील प्राणवायू गळतीनंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. या कारणाने प्रकरण अधिक तीव्र होत चालले आहे. कोरोना बाधित रुग्णांना धीर अथवा दिलासा देण्याऐवजी राजकारणातच चर्चा रंगल्या आहेत. यामुळे लोकांचे त्रास होत आहे.

दरम्यान, २१ एप्रिल २०२० मध्ये महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात प्राणवायू गळती झाली. यामध्ये २२ जणांना आपला प्राण गमवावा लागला. या कारणामुळे लगेच महानगरपालिकेतील सत्ता म्हणून भाजपावर दोषारोप करण्यापासून महापौरांचा राजीनामा मागण्यापर्यंत विरोधकांनी राजकारण रंगवले. वास्तविक, महापालिकेतील ठेके हे फक्त सत्तारूढ पक्षाचे नेते देतात असे नाही तर ज्या स्थायी समितीत ठेक्यांना अंतिम रूप दिले जाते. तेथे सर्वपक्षीय सदस्य असतात. स्थायी समितीत कोणताच पक्ष नसतो, सर्व एकत्रित काम करीत असतात. असा वेळी ठेकेदारीवरून सत्तारूढ भाजपाला धारेवर धरणारे नेते मग स्थायी समितीत सदस्य असणाऱ्या आपल्या सदस्यांना जाब का विचारत नाहीत हा तर सवाल निर्माण होतो.

प्राणवायू गळती प्रकरणावरील राजकारण थांबत नाही तोच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दाैऱ्यावरून राजकारण सुरू झाले. बिटको रूग्णालयात त्यांनी भेट घेऊन आढावा देण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रश्न उपस्थित केले. त्यावरूनही मग शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीत एकमेकांस आरोप प्रत्यारोप सुरु झाले. अगोदरच लोक कोरोना विषाणूने अधिक त्रस्त झाले आहेत. तर राजकारण कुठे आणि किती करावे याला ही मर्यादा आहेत. मात्र, आता नाशिक महापालिकेच्या निवडणूकांच्या तोंडावर सर्वांनीच तीलांजली दिल्याचे समोर दिसत आहे.

राज्य आणि केंद्रातील भिन्न सरकारांमुळे सध्या जे मदत आणि अत्यावश्यक उपचार सुविधा आणि वाढणारे रूग्ण यावरून जे राजकारण सुरू आहे. तेच आता स्थानिक पातळीवर देखील दिसत आहे. खासगी रूग्णालयात बेड मिळत नाही, प्राणवायू मिळत नाही आणि रेमडेसिवर इंजेक्शनचा ताबा प्रशासनाने घेऊन देखील काळ्याबाजारात खरेदी करावी लागत आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता लोकांना राजकारणापेक्षा दिलासा, मदत आणि आरोग्याच्या सुविधेचा पुरवठा अपेक्षित आहे.