डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयाला सन्मान मिळवून दिला – जेष्ठ पत्रकार अशोक बालगुडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करण्याची जबाबदारी आपली आहे. सक्षम विचारांचा समाज निर्माण झाला पाहिजे. कोणावर अन्याय होत असेल, त्याला सनदशीर मार्गाने वाचा फोडली पाहिजे. कायद्याचे राज्य आहे, घटनेने प्रत्येकाला जगण्याचा अधिकारी दिला आहे. प्रत्येक नागरिकाला डॉ. बाबासाहेबांनी सन्मान मिळवून दिला आहे, त्यांचा आपल्याला स्वाभीमान आहे, असे ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे नी सांगितले.

फुरसुंगीतील आचल प्लाझा गृहनिर्माण सोसायटीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक विठ्ठल राऊत, हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस नाईक रामदास चिंचकर, सोसायटीचे सचिव सुरेश जगदाळे, सदस्य मधुकर होले, अॅड. धनाजी जाधव, सूर्यकांत वाघमारे, हरेश सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते.

हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक विट्ठल राऊत म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे सर्वांच्याच मनात भीतीचे सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे आचरण करून, समाज सक्षम विचारांचा करू या, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.