राज्यसरकारकडून दुष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता यानुसार 180 तालुक्यांमध्ये उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची घोषणा केली.

राज्यात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. दुष्काळसदृश्य भागाच्या पाहणीसाठी लवकरच केंद्राची टीम राज्यात येईल आणि त्यानंतर मदतीची घोषणा होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये उपाययोजनांना सुरुवात होईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
कोणत्या उपाययोजना राबवल्या जाणार-
– जमीन महसुलात सूट
– शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
– टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित होणार नाही
– पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकर योजना
– कृषी पंपाच्या बिलात सूट
– शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट
– रोहयोच्या अंतर्गत कामाच्या निकषात सूट

राज्यात यंदा कुठे, किती पाऊस झाला?
यंदा राज्यात सरासरी 75 टक्के पाऊस झाला आहे. काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरीही बहुतांश भागांत पाऊस रुसलेलाच पाहायला मिळाला.

  • सोलापूर जिल्ह्यात फक्त 25 टक्के पाऊस
  • 13 जिल्ह्यांत 50 टक्के ते 75 टक्के पाऊस
  • 26 तालुक्यांत फक्त 25 टक्के पाऊस
  • 139 तालुक्यांत 50 टक्के पाऊस
  • 123 तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती

दुष्काळामुळे शेती संकटातउत्पादन घटणार

भात, मका, नाचणी, ज्वारी, सोयाबीन ही पिकं ऐन भरात असताना पाण्याचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे यावेळी राज्यात शेतमालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, कापसाचं पीक फुल आणि बोंड लागण्याच्या अवस्थेत आहे, पण पाणीच नाही. मागच्या वर्षी बोंडअळीच्या रोगाने कापसाच्या पिकावर मोठा परिणाम झाला होता आणि यंदा पावसाअभावी हे पीक हातचं जाणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

कोणत्या भागात होतोय टँकरने पाणीपुरवठा?

  • 342 गावं आणि 498 वस्त्यांमध्ये पाणीटंचाई
  • एकूण टँकर – 354
  • मराठवाडा – 198 टँकर
  • खानदेश – 125 टँकर
  • कोकण – 53 टँकर
  • नागपूर विभागात एकही टँकर लावण्यात आला नाही.

    औरंगाबाद , नाशिक, जालना, अहमदनगर, जळगाव, जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत भीषण आहे.  दरम्यान, गेल्यावर्षी राज्यात केवळ 98 टँकर्सची आवश्यकता भासली होती.

जाहिरात