कॅन्सरग्रस्तांना दिलासा ; कॅन्सरवरील औषधे होणार स्वस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने कॅन्सरच्या औषधांच्या विक्रीत नफ्याची कमाल मर्यादा ३० टक्के केली आहे. परिणामी, कॅन्सरवरील ४२ नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. येत्या ८ मार्चपासून या औषधांच्या सुधारित  किमती लागू करण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना प्राधिकरणाने बुधवारी प्रसिद्ध केली.
‘ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन’ पद्धतीने औषधांच्या किमतींवर नियंत्रण
कर्करोगावरील खर्चिक उपचार आणि महागड्या औषधांमुळे अनेक रुग्णांना योग्य व निरंतर उपचार घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने कर्करोगावरील औषधांच्या विक्रीवर असलेल्या ट्रेड मार्जिनची ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रेत्यांकडून घेत असलेली किंमत आणि प्रत्यक्ष रुग्णाला औषध खरेदी करताना द्यावी लागणारी किंमत यात तफावत आहे. ती लक्षात घेऊनच नफ्यावर नियंत्रण आणण्यासाठी ‘ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन’ पद्धतीने औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्यात येणार आहे.औषधविक्रीमध्ये किती टक्के नफा असावा, हे ठरवण्यासाठी सरकारने औषध नियंत्रण नियमावलीमधील एकोणीसाव्या निर्देशाचा वापर केला आहे. त्यानुसार औषधनिर्मिती कंपन्यांनी घाऊक विक्रेत्यांसाठीची खरेदी किंमत आणि प्रत्यक्ष रुग्णांकडून आकारण्यात येणारी किंमत आधीच ठरवावी अशी सूचना प्राधिकरणाने दिली आहे.
देशात १.५ दशलक्ष कर्करोगाचे रुग्ण असून, २०१८ मध्ये आठ लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कर्करोगाच्या उपचाराचा खर्च इतर आजारांच्या तुलनेत अडीच पटीने अधिक आहे. त्यामुळे त्यावरील औषधे परवडणाऱ्या दरात मिळणे अत्यावश्यक आहे. ती मिळाली, तर उपचार वेळेत होतील या उद्देशाने हे नियंत्रण आणले गले आहे.