Nashik News : अरे देवा ! बिटाचा प्रयोग शेतकर्‍याच्याच अंगलट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील येवला तालुका तसा दुष्काळी पट्टा. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून बिटाची शेती केली. मात्र, बीटाचा हा प्रयोग शेतकऱ्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसत आहे.

तालुका दुष्काळी असला तरी परिसरातील शेतकरी प्रयोगशील आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बीटाची लागवड केली. बीट लागवडीसाठी एकरी मजुरी, खते, औषधे आणि बियाणे असा जवळपास ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. दोन ते अडीच महिन्यांत पीक विक्रीसाठी तयार होते. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून बीटाचे बाजारभाव कोसळले. बीटाची मागणी आणि निघणारे उत्पादन यामुळे बीट पिकाचे बाजारभाव घसरल्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागला.

पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली
शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून बीटाची शेती केली. पण, ५० ते १०० रुपये किलोने विकणारे बीट सध्या बाजारात दोन ते तीन रुपये किलोने विकत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघेना झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याची परिस्थिती पहिल्याच वर्षी उद्भवली आहे.

बीट काढणीसाठी आले तेव्हा बाजारभाव पडले
कांदा रोपे नसल्याने राजापूर भागातील शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात बीट पिकाची लागवड केली. लागवड केली तेव्हा बीट बाजारभाव चार ते पाच हजारांपर्यंत होता. मात्र, बीट काढणीसाठी आले तेव्हा बाजारभाव पडल्याने केलेला खर्चही वसूल झाला नाही. येथील शेतकरी माधव अलगट यांनी सांगितले की, मी चार एकर बीटाची लागवड केली होती. त्यासाठी ४० हजार रुपयांहून अधिक खर्च झाला. तर चार एकरांतून लाख रुपयांचे उत्पादन झाले. त्यामुळे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा त्यांना तोटा सहन करावा लागला.