महापौरांची पुतळा स्वच्छता मोहीम, कार्यकर्ता शिडीवरून पडून गंभीर जखमी 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने धुळ्यात पुतळ्यांची स्वच्छता करण्याची मोहीम धुळ्याच्या महापौरांनी हाती घेतली आहे. यावेळी स्वच्छता करताना एक कार्यकर्ता शिडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाला. या कार्यकर्त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. महापालिकेचे कर्मचारी काय करतात आणि स्वतः महापौर अशी कामे कार्यकर्त्यांकडून का करुन घेतात, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी शहरातील पारोळा रोडवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची साफसफाई करण्यात येत होती. मात्र, साडेबाराच्या सुमारास पुतळ्याची साफसफाई करण्यासाठी महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह त्यांचा मुलगा नगरसेवक देवेंद्र सोनार तसेच भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते जमले. यावेळी पुतळ्याची साफसफाई करण्यासाठी अमोल नावाचा एक कार्यकर्ता शिडीवरून महाराजांच्या पुतळ्याजवळ जाण्यासाठी चढला. मात्र, याच दरम्यान अमोलचा हात सटकला आणि तो थेट खाली पडला.

या घटनेत अमोल हा गंभीर जखमी झाला आहे. खाली पडताच तो बेशुद्ध झाला आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्याला उचलून लगेच खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत त्याच्या डोक्याला जबर मार बसला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी महापालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. महापालिकेचे कर्मचारी काय करतात आणि स्वतः महापौर अशी कामे कार्यकर्त्यांकडून का करुन घेतात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.