हिंगोली जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, तालुक्याच्या सीमेवरील गावांना वारंवार बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांमुळे या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. काल सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्ह्यात पुन्हा 3.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. अकोला जिल्ह्यातूनही भूकंपावर माहिती विचारली जात होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन संचालकांना यासंदर्भात अहवाल दिला आहे.

जिल्ह्यातील पोत्रा, येहळेगाव, बोल्डा, पारडी खुर्द, कोठारी, कोठारवाडी, कुरुंदा, पांगरा शिंदे, वापटी, खांबाळा, कुपटी, राजवाडी, शिरळी, पिंपळदरी या गावांना 23 जूनच्या सायंकाळी सहाच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दरम्यान, या भागात कळमनुरीच्या तहसीलदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी देखील काही गावांना असे भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले असताना अकोला जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या चर्चेने आणखीनच चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अकोला जिल्ह्यातून अनेकांकडून याबाबत विचारणा करण्यात येत होती. मात्र, हे भूकंपाचे धक्के केवळ हिंगोली जिल्ह्यातच घडल्याचे सुत्रांकडून कळते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.