ब्रिटनमध्ये या औषधानं कोरोना रूग्णांवर उपचार, सरकारनं सांगितलं सर्वात मोठं पाऊल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  ब्रिटेनने मंगळवारी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अँटी व्हायरल औषध रेमिडिसीवीरच्या वापरास मान्यता दिली. या वेळी ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक म्हणाले की, कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी बहुदा हे सर्वात मोठे पाऊल आहे. अमेरिका आणि जपान यांनी या औषधाच्या मर्यादित वापरास आधीच मान्यता दिली आहे. ब्रिटनमधील आता हे पहिले औषध असेल जे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मंजूर झाले आहे. दरम्यान, अमेरिकेने 1 मे रोजीच या औषधास मान्यता दिली होती, म्हणजेच सुमारे 3 आठवड्यांनंतर त्याला यूकेमध्ये मान्यता देण्यात आली. काही अभ्यासांमधून दिसून आले की, अँटी-व्हायरल औषध रेमेडिसिवीर कोरोना रुग्णांचा रिकव्हर होण्याचा वेळ कमी करते. हे औषध पूर्वी इबोलाच्या रूग्णांवर देखील वापरले गेले होते.

दरम्यान, मर्यादित पुरवठ्यामुळे हे औषध केवळ निवडक रूग्णांना दिले जाईल, विशेषत: अशा रूग्णांना ज्यांना या औषधाचा सर्वाधिक फायदा होऊ शकेल. या औषधाच्या व्यापक वापरासाठी सरकारला कंपनीबरोबर करार करावा लागेल. हे गिलियड सायन्सेस नावाच्या कंपनीने बनवले आहे. एका अभ्यासानुसार, या औषधाच्या वापराने रुग्ण 4 दिवस आधीच बरा होतो. परंतु याक्षणी या औषधाने कोरोना रूग्णांचे प्राणही वाचू शकतील असा पुरावा नाही.

रेमेडिसिव्हिर औषध केवळ वैद्यकीय कर्मचार्‍यांद्वारेच रूग्णांना इंजेक्ट केले जाऊ शकते. अशी अपेक्षा आहे की, हे औषध पहिल्यांदा प्रौढ आणि किशोरवयीन मुलांना दिले जाईल. मात्र, ब्रिटनमधील डॉक्टर केसच्या आधारे यावर अंतिम निर्णय घेतील.