5000 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधींच्या अत्यंत विश्वासू असलेल्या नेत्याची ED कडून निवासस्थानी चौकशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत असून यामध्ये मोठं – मोठे उद्योगपती, राजकीय नेते यांच्या नावांचा समावेश आहे. आता 5 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू अहमद पटेल यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे.

अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि राजकीय सल्लागार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे नाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आले आहे. याप्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे करण्यात येत आहे. संदेसरा ब्रदर्सचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण समोर आले होते. यामध्ये जवळपास पाच हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानुसार आता त्यासंबधी अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे एक पथक त्यांच्या घरी गेले आहे.
ईडीच्या पथकामध्ये तीन सदस्य असून हे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट येथील निवासस्थानी चौकशी करण्यासाठी गेल्याची माहिती दिली जात आहे.

आता अहमद पटेल यांचा जबाब आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात (PMLA) नोंद करण्यात येणार आहे. दरम्यान, अहमद पटेल यांना चौकशीसाठी ईडीकडून दोनदा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांचे वय जास्त असल्याने घरी राहण्याच्या सूचनेमुळे ते घरीच आहेत. ते स्वत: ईडीच्या कार्यालयात येऊ शकत नसल्याने ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी चौकशीसाठी येणार होते. त्याबाबतची कल्पनाही त्यांना देण्यात आली होती. त्यानंतर हे पथक पटेल यांच्या घरी पोहचले आहे.