ही ED च भाजपला संपवणार, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांच्यावर ‘ईडी’ने (ED) लावलेल्या चौकशीला कुठलाच आधार नव्हता. आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकार्यांपर्यंत जायचं. कुठेही ‘ईडी’चा वापर करायचा. हे जे काही अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचं (BJP) चाललेलं आहे. ही ‘ईडी’च त्यांना संपविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रयत्नातून मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी आमदार विलास लांडे, देवदत्त निकम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, हे केंद्रातील भाजपचे सरकार शेतकरी, शेतमजूर कामगारांच्या विरोधातील आहे. सुरुवातीला विश्वास देतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत डोक्यावर घेऊ. मात्र, तेच पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकरी आणि कामगार मजुरांना पायाखाली तुडवतात. याचा प्रत्यय आता सुरू असलेल्या आंदोलनात होतोय. शेतकऱ्यांबाबत केंद्राने जो कायदा केला आहे, तो कायदा शेतकऱ्यांना पूर्णपणे संपवणार आहे. उद्या जर शेतकरी संपला तर हा कृषिप्रधान असलेला देश संपणार आहे.