शेतकरी आंदोलन : खा. संजय राऊत यांनी घेतली आंदोलक शेतकऱ्यांची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन दोन महिन्यांपासून सुरु आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर काही संघटनांनी माघार घेतल्यामुळे आंदोलन थंडावले असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा या आंदोलनानं जोर पकडला आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी आज गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनंतर आपण शेतकऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. सीमेवर आदोलनकर्त्यांच्या भेटीदरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांची आपण भेट घेतली. आमच्या संवेदना आणि पाठिंबा व्यक्त केला. सरकारनं शेतकऱ्यांशी योग्य पद्धतीने संवाद साधायला हवा. अहंकार देश चालवण्यासाठी मदत करणार नाही, अशी चपराकही त्यांनी भाजपला लगावली.

भेटीपूर्वी केले होते ‘हे’ ट्विट
संजय राऊत यांनी स्वत: ट्विट करुन माहिती देताना म्हटले होते की, महाविकस आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजवर प्रत्येक सुखदु:खात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. त्यांच्याच सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहे, असे ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटले होते.