Coronavirus Impact : कोरोनाचा राज्यात ‘हाहाकार’ ! एकविरा देवीची यात्रा रद्द

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई, पुणे, ठाणे परिसरात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध कार्ला गडावरील एकविरा देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने घेतला आहे. वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व प्रशासकीय समितीचे अध्यक्ष, सचिव व तहसीलदार आणि धर्मादाय आयुक्त यांनी भाविक आणि वेहेरेगाव ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून हा निर्णर जाहीर केला.

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून, जाहीर यात्रा न करण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने घेतला आहे. चैत्री यात्राकाळातील एकविरा देवीचे धार्मिक विधी आणि पूजापाठ केले जाणार आहेत. एकविरा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील वेहेरेगाव मध्ये असून, चैत्री काळातील यात्रेनिमित्त लाखो भाविक येथे येतात. गर्दीमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली गेली आहे.

देशासह महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून, सार्वजनिक कार्यक्रम, शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिले आहेत. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.