निवडणूक आयोगाची लग्नपत्रिकांवर देखील करडी नजर, होणार चौकशी 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  निवडणूक प्रचाराला देखील वेग आला आहे.  उमेदवार प्रचारासाठी कोणते फंडे वापरतील याचा नेम नाही.  यातच काही लग्न पत्रिकांमधून देखील प्रचार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. पण निवडणूक आयोगाची मात्र उमेदवारांवर करडी नजर आहे.  म्हणूनच लग्नपत्रिकांची चौकशी करुन उमेदवाराच्या खर्चात पत्रिकांचा खर्चाचा समावेश होणार आहे. नागपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी ही माहिती दिली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाने ७० लाख रुपयांची मर्यादा ठरवून दिली आहे. यापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या उमेदवारावर निवडणूक आयोगाची नजर आहे. याचे उल्लंघन केल्यास उमेदवाराला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.  लग्नपत्रिकेचा वापर करुन उमेदवारासाठी मत मागण्याचा प्रकार इतर ठिकाणीही होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे आता निवडणूक आयोग लग्नपत्रिकाही तपासणार आहे. यासाठी उमेदवाराच्या खर्चाची तीन वेळा तपासणी केली जाणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

आहेर नको… ‘या’ नेत्याला मतदान करा

दरम्यान सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम आहे. निवडणुकीतील खर्च लपवण्यासाठी उमेदवार नामी शक्कल वापरताना दिसत आहेत. सांगलीतील वाळवामध्ये ३१ मार्च रोजी असलेल्या विवाहाची पत्रिका सध्या व्हायरल होत आहे.  या पत्रिकेवर लग्नाच्या निमंत्रणासोबतच एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला मतदान करण्याची टीपही लिहिली आहे.  एव्हढेच नाही तर कोल्हापुरात देखील एका कार्यकर्त्याने मुलाच्या लग्न पत्रिकेवर आहेराऐवजी आपल्या लाडक्या नेत्याला मतदान करण्याचे आवाहन केले होते.  त्याची देखील जोरदार चर्चा रंगली होती.