इम्रान हाश्मीच्या मुलाने जिंकली कॅन्सरशी लढाई ; ५ वर्ष करत होता संघर्ष 

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार हे कॅन्सर आजाराने ग्रस्त आहे काहींचा कॅन्सर बराही झाला तर अजूनही काहीजण या आजाराशी लढत आहे. काही वर्षापूर्वी अभिनेता इम्रान हाश्मी याच्या मुलालाही कॅन्सर झाला होता. आता इम्रान हाश्मीचा मुलगा पूर्णपणे या आजारातून बरा झाला आहे. याची माहिती खुद्द इम्रान हाश्मीने दिली आहे.
 इम्रान हाश्मी याचा मुलगा अयान याला तीन वर्षाचा असताना २०१४ मध्ये कॅन्सर झाल्याचे कळले होते. पण आता तो पूर्णपणे बरा झाला असून या बद्दल इम्रान हाश्मीने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिले “कॅन्सर या आजाराने आज ५ वर्षानंतर अयान पूर्णपणे बरा झाला आहे, हा खूप मोठा प्रवास होता. तुम्ही सगळ्यांनी केलेली प्रार्थना आणि दिलेले आशीर्वाद या बद्दल धन्यवाद. त्या लोकांसाठी माझ्या प्रार्थना आणि आशीर्वाद जे लोक  कॅन्सर या आजारापासून लढत आहे. आशा आणि विश्वास ठेवा ही लढाई तुम्हीच जिंकणार”.
‘द किस ऑफ लाइफ’ या पुस्तकात इम्रान याने आपल्या मुलाच्या कॅन्सर संघर्षाविषयी सांगितले आहे.   इम्रान हाश्मी याचा ‘वाय चीट इंडिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात इम्रान एका भ्रष्ट शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका त्याने आजपर्यंत साकारलेल्या इतर भूमिकेपेक्षा वेगळी आहे. हा चित्रपट त्याच्या  नावावरूनही काही दिवसापूर्वी चर्चेत होता .