गडचिरोलीत जांभिया-गट्टा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 2 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यामध्ये चकमक झाली. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांकडून अद्यापही जंगल परिसरात नक्षलवाद्यांची शोध मोहीम सुरु आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

22 एप्रिलच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. यावळी पोलिसांनी सावध पवित्रा घेत गोळीबारास प्रत्युत्तर दिले होते. रात्रीच्या अंधारात पोलिसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करुन घातपात घडविण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा गोळीबार केला होता. एवढेच नाही तर एक हँडग्रेनेडही फेकला होता. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली होती. आज पहाटे पोलिस जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. यावेळी दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर देत गोळीबार केला असता चकमकीत दोन नलक्षलाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस दलाला यश आले.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले की, दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्या भागात अजूनही सर्चिंग ऑपरेशन सुरु आहे. घनदाट जंगल असल्याने त्या बागात संपर्क होऊ शकला नाही.