‘मातोश्री’वर धमकीचे फोन करणारा अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी मातोश्रीवर धमकीचा फोन आला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन आले होते. त्यावर दया नयाक तपास करत होते. दया नायक यांनी आरोपीच्या कोलकाता येथून मुसक्या आवळल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंबंधी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली जाणार आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एका अज्ञात नंबरवरून धमकीचे फोन आले असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली होती. एवढंच नाही तर खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले होते. देशमुख यांनी कंगना राणौतवर टिप्पणी केल्यानंतर हे फोन आल्याचे म्हटले होते. या प्रकरणाची चौकशी सुरक्षा यंत्रणा करत होती.

ज्यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांची क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी आरोपींचा शोध घेत त्यांना कोलकाताहून ताब्यात घेतलं. तर आरोपींची पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानवर दुबईवरून अज्ञात व्यक्तीने फोन करुन धमकी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. दुबईहून अज्ञात व्यक्तीने तीन ते चार फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याची माहिती पुढे आली होती.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारा व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बाँबने उडवून देण्याची धमकी देणारा व्यक्ती कोण ? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत होती. मातोश्री निवासस्थानी शनिवारी रात्री 11 च्या सुमारास 4 फोन कॉल दुबईच्या नंबरवरुन आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलीस ऑपरेटरने घेतले होते. त्यानंतर मातोश्री बंगल्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती.