इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक रॉबिन जॅकमन यांचे निधन

लंडन : वृत्तसंस्था – भारतात जन्मलेल्या इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक रॉबिन जॅकमन यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना शुक्रवारी रात्री निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ होते. २०१२ मध्ये त्यांना घशाचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. स्वरयंत्रातील धोकादायक असा ट्युमर काढल्यानंतर दोनवेळा जॅकमन यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. रॉबिन जॅकमन यांच्या निधनाची माहिती आयसीसीने ट्विटरवरून दिली.

दरम्यान, रॉबिन जॅकमन यांच्या निधनाआधीच इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जॉन एडरिक यांचेही निधन झाले होते. रॉबिन आणि जॉन हे दोघेही सरेकडून खेळत होते.
महान समालोचक आणि इंग्लंडचे माजी गोलंदाज रॉबिन जॅकमन यांचे निधन झाले. या दु:खाच्या प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे, असे सांगत त्यांना आयसीसीने आदरांजली वाहिली.

हिमाचलमधील शिमला येथे रॉबिन जॅकमन यांचा जन्म झाला होता. जॅकमन यांनी इंग्लंडकडून चार कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत जॅकमन यांनी ३३ बळी घेतले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी मार्च १९८१ मध्ये पहिली कसोटी खेळली होती. तसंच वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली होती. जॅकमन यांनी वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलं होतं. त्यात जॅकमन यांनी ३९९ सामने खेळताना २२.८० च्या सरासरीने १४०२ गडी बाद केले होते. याशिवाय ५ हजार ६८१ बळीही घेतले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी बराच काळ समालोचक म्हणून काम केलं.