वायुसेनेच्या विमानाला अपघात, ग्रुप कॅप्टनचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय वायुसेनेच्या मिग – 21 बायसन विमानाच्या बुधवारी (दि. 17) झालेल्या अपघातात ग्रुप कॅप्टनचा मृत्यू झाला. आज सकाळीच हे विमान मध्य भारताच्या एका एअरबेसहून लढाऊ प्रशिक्षण मिशनसाठी रवाना झाले होते. त्यानंतर काही वेळातच या विमानाचा अपघात झाला. दरम्यान अपघात नेमका कसा झाला? याचे कारण जाणून घेण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.

ए. गुप्ता असे अपघातात मृत्यू झालेल्या ग्रुप कॅप्टनचे नाव आहे. आम्ही ग्रुप कॅप्टन गुप्ता यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत, असे म्हणत भारतीय वायुसेनेकडून कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी देखील 5 जानेवारी रोजी राजस्थानच्या सूरतगढ एअरबेसवर एका मिग 21 बायसन विमानाला अपघात झाला होता. या विमानाने सूरतगढ एअरबेसवरून उड्डाण केल्यांतर वेळातच ते खाली कोसळले होते. परंतु, या अपघातात पायलट सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाला होता.