रोजगार मेळाव्याची पोलखोल, युवकास भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – तरूणांना रोजगार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात युवकांची घोर फसवणूक केली जात आहे. त्यांना नोकरीचे गाजर दाखवले जात आहे, असा आरोप एका युवकाने केला. या मेळाव्याची पोलखोल करणारा व्हिडिओ या युवकाने सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला. मात्र, या प्रकाराने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी या युवकाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. बल्लारपूर येथे आयोजित महारोजगार मेळाव्यात हा धक्कादायक प्रकार घडला.

या युवकाने रविवारी यासंदर्भातला एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात त्याने हा रोजगार मेळावा म्हणजे युवकांची फसवणूक असल्याचे म्हटले होते. बल्लारपूर (बामणी) येथे २ दिवसीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्हा प्रशासन, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, आमदार अनिल सोले अध्यक्ष असलेली फॉरचून फाउंडेशन आणि जिल्हा कौशल्य विकास यांच्यामार्फत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राज्यातील ५३ कंपन्यांचे स्टॉल होते. जिह्यातील बेरोजगार युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी हा यामागचा उद्देश होता. याकरीता जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ३८ हजार युवकांनी आपली ऑनलाईन नोंदणी केली असून त्यांना मुलाखतीकरिता बोलावण्यात आले होते. या मुलाखतीसाठी भास्कर कावळे हा युवक देखील गेला होता. मात्र, हा रोजगार मेळावा जिल्ह्यातील बेरोजगारांची क्रूर थट्टा असल्याचे सांगत भास्करने एक व्हिडिओ तयार केला. मेळाव्याच्या ठिकाणीच तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये त्यानी या रोजगार मेळाव्यावर ताशेरे ओढले.

महागाईच्या काळात पुणे आणि मुंबई येथील कंपनीत युवकांना ४ ते ५ हजार पगार देऊन नियुक्ती केली जात आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बेरोजगारांना गाजर दाखवले जात आहे, असा आरोप त्याने व्हिडिओत केला आहे. हा व्हिडिओ एकाच दिवसात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी भास्करला मारहाण करण्यात आली आहे. तो दारू पिऊन असभ्य वर्तन करीत होता, म्हणून त्याला चोप दिल्याचा उलटा आरोप भाजप कार्यकत्र्यांनी केला आहे. मारहाणीच्या घटनेची महिती मिळताच काँग्रेस, बीआरएसपीच्या कार्यकत्र्यांनी पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली होती. तेथे भाजप कार्यकर्तेही जमले होते. यामुळे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवळ व्हिडिओ तयार केला यामुळेच भास्करला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे आधी त्याची पाहणी करावी नंतरच कारवाई करावी, अशी मागणी विरोधकानी यावेळी केली.