प्रियंका गांधींच्या आरोपांवर पोलिस संतप्त, CO अर्चना सिंह म्हणाल्या, ‘त्यांना नाही तर मला धक्का देऊन पाडण्यात आलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लखनऊ येथील सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापूरी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध केला म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यासंदर्भात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी त्यांची भेट घेतली. मात्र या दरम्यान प्रियंका यांना पोलिसांनी वाटेतच रोखण्याचा प्रयत्न केला आणि एका महिला पोलिसाने त्यांचा गळा पकडला आणि त्यांना खाली पाडले. मात्र पोलिसांनी प्रियंका यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत असे म्हटले आहे.

प्रियंका यांनी हे आरोप केले होते
प्रियंका यांनी आरोप केला की, “मी कारमधून खाली उतरले आणि चालू लागले. पण मला घेरण्यात आले आणि एका महिला पोलिसाने माझा गळा आवळून मला धक्का दिला आणि मी पडले. नंतर मला पुन्हा पकडल्यानंतर मी एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवर गेले. परंतु त्यालाही ढकलण्यात आले.”

प्रियंका गांधी यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिताना म्हटले की, “पण माझा निर्धार अटळ आहे. उत्तर प्रदेशात पोलीसांच्या दडपणाचा बळी पडलेल्या प्रत्येक नागरिकाबरोबर मी उभी आहे. तो माझा सत्याग्रह आहे. भाजप सरकार भ्याडपणा दाखवत आहे. मी उत्तर प्रदेशची प्रभारी आहे आणि मी राज्यात कुठे जायचे हे भाजपचे सरकार ठरवणार नाही.” मात्र पोलिसांनी प्रियंकानी केलेेले आरोप चुकीचे म्हणून फेटाळले आहेत.

पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले
पोलिस अधिकारी अर्चना सिंह यांनी आपल्या उच्च अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, प्रियंका गांधींच्या कार्यक्रमात त्यांची ड्युटी ही ताफ्यातील प्रभारी म्हणून ठेवण्यात आली होती. प्रियंका गांधी गोखले मार्गावर कौल हाऊसकडे रवाना झाल्या, परंतु त्यांची गाडी निर्धारित मार्गावर न जाता लोहिया मार्गाकडे जाऊ लागली. यावर त्यांना कुठे जायचे आहे असे विचारले गेले होते. अर्चना यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी प्रियंकांच्या गंतव्यस्थानाविषयी माहिती देण्यास नकार दिला. यानंतर प्रियंका कारमधून खाली उतरल्या आणि कार्यकर्त्यांसह चालू लागल्या. गळा आवळणे, पडणे इत्यादी काही दिशाभूल करणार्‍या गोष्टी सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात आहेत, जे पूर्णपणे असत्य आहेत. अर्चना म्हणाल्या की मी फक्त माझे कर्तव्य करत होते. खरं तर मलाच वेढून धक्का देण्यात आला आणि मी खाली जमिनीवर कोसळले.

प्रियंका गांधींनी हे प्रश्न केले होते
प्रियंका म्हणाल्या, “दारापुरी हे ७७ वर्षांचे माजी पोलिस अधिकारी आहेत. शांततेत निदर्शने करण्यासाठी त्यांनी फेसबुकवर पोस्ट केले होते. असे असूनही पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांची पत्नी खूप आजारी आहे. हे सर्व का? कारण त्यांना आपले धोरण आवडत नाही?”

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक सिंह म्हणाले की, लोहिया चौकात जेव्हा एका पोलिस अधिकाऱ्याने प्रियंकाच्या गाडीसमोर आपली गाडी लावली तेव्हा त्या पायी चालू लागल्या. सुमारे एक किलोमीटर अंतरावर पूल पार केल्यानंतर प्रियंका पुन्हा गाडीवर बसल्या. पुढे, मुन्शी पुलिया भागात पोलिसांनी त्यांना पुन्हा थांबवले, त्यानंतर ते पुन्हा चालू लागल्या आणि अचानक इंदिरा नगरच्या सेक्टर १८ मधील एका गल्लीत त्या वळल्या.

या हाय व्होल्टेज नाटकात खळबळ माजलेल्या पोलिस आणि पक्षनेत्यांमध्ये अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रियंका या कुठे गेल्या हे काही काळ कुणालाच माहित नव्हते. नंतर कळले की त्या दारापुरीच्या घरी पोहोचल्या आहेत. या दरम्यान त्यांनी सुमारे तीन किलोमीटर पायी प्रवास केला.

‘प्रत्येकाचे राजकारण धोक्यात आहे’
दारापुरीच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रियंकाने पत्रकारांना सांगितले की, ‘मी गाडीत शांततेत जात होते, त्याने कायदा व सुव्यवस्था कशी बिघडणार होती? मी कोणासही सांगितले नाही जेणेकरून तीनपेक्षा जास्त लोक माझ्याबरोबर येऊ नयेत. मी पायी चालत असताना मला थांबविले गेले. मला थांबवण्याचा त्यांचा अधिकार नाही. अटक करायची असेल तर करा.’ तसेच त्यांना प्रश्न करण्यात आला की, त्यांच्यामुळे राजकारणाला धोका आहे असे सरकारला वाटते का, या प्रश्नावर प्रियंका म्हणाल्या की, ‘प्रत्येकाच्या राजकारणाला धोका आहे.’

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/