गिर्यारोहक प्रेमलता अग्रवाल यांच्या घरी चोरी, लाखो रुपयांसह ‘पद्मश्री’ पुरस्कार चोरीस

जमशेदपूर : वृत्तसंस्था – देशातील गिर्यारोहक प्रेमलता अग्रवाल यांच्या घरातून पद्मश्री पुरस्कार आणि त्यासह लाखो रुपये चोरांनी चोरले आहेत. प्रेमलता अग्रवाल यांच्या कडमा निवासस्थानी (७१ केडी फ्लॅट) ही चोरी झाली आहे. या घटनेत त्यांना भारत सरकारकडून मिळालेला पद्मश्री पुरस्कारही चोरी झाला आहे.

२०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याशिवाय २० हजार रुपये रोख, १५ चांदीची नाणी आणि संगणकाच्या दोन हार्ड डिस्कसह चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला. घटनेच्या रात्री घरी कोणी नव्हते. प्रेमलता अग्रवाल आपल्या कुटुंबासह दुसर्‍या निवासस्थानी होत्या.

सोमवारी पहाटे पाच वाजता चोरीच्या घटनेची माहिती मिळताच सिटी एसपी सुभाषचंद्र यांनी येऊन तपास सुरू केला. यासंदर्भात प्रेमलता यांचे पती विमल अग्रवाल यांच्या निवेदनावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध कडमा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमल अग्रवाल यांनी पोलिसांना सांगितले की, सोमवारी पहाटे पाच वाजता ते आपल्या ७१ केडी फ्लॅटच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना मुख्य दरवाजाचा काही भाग तुटलेला दिसला. कुलूप उघडून घरात प्रवेश केल्यावर मुख्य दरवाजाच्या वरचे स्कायलाईट तुटलेले होते. आतल्या खोलीतील काच देखील फुटली होती.

प्रेमलता अग्रवाल ही भारताची पहिली वयोवृद्ध महिला आहे, ज्या वयाच्या ४८ व्या वर्षी २० मे २०११ रोजी एव्हरेस्टच्या शिखरावर चढल्या होत्या. वयाच्या ५० व्या वर्षी २३ मे २०१३ रोजी त्यांनी उत्तर अमेरिकेच्या अलास्का येथे माउंट मॅकॅनलेवर विजय मिळवून एक नवीन कामगिरी केली. या पर्वत शिखरावर चढणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

सात खंडांच्या शिखरावर चढणाऱ्या प्रेमलता एक उत्तम गृहिणी आहेत. वयाच्या ३५ व्या वर्षानंतर त्या पहिल्यांदा गिर्यारोहणात सामील झाल्या. १९८४ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला म्हणून ओळख मिळवणाऱ्या बछेन्द्री पाल त्यांच्या मोहिमेची देखरेख करत होत्या. बछेन्द्री यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी दार्जिलिंग येथून गिर्यारोहण शिक्षण घेतले आहे.