…आणि आशुतोष राणा यांनी केली ,नसीरुद्दीन शाह यांची पाठराखण !

मुंबई : वृत्तसंस्था – काही दिवसापूर्वी अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी  ‘देशात माणसाच्या जीवापेक्षा गाईचा जीव अधिक महत्त्वाचा आहे’. असे वक्तव्य केले होते या वक्तव्यावरून यांच्यावर अनेक स्तरांतून  टीका करण्यात आल्या. अजमेर येथे प्रमुख पाहुणे असलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला  निदर्शनामुळे बंद करण्यात आले .अनेक कलाकारांनीही शाहांच्या या वक्तव्याला विरोध करत नाराजी व्यक्त केली. मात्र, आता अभिनेता आशुतोष राणा यांनी शाहांची पाठराखण करत प्रत्येकाला आपले विचार आणि मत मांडण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.

प्रत्येकाला आपले विचार कोणत्याही भितीशिवाय आपल्या मित्रांसोबत आणि इतर लोकांसमोर मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या मित्रांनी किंवा इतर बांधवांनी जर एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मत मांडलं तर ते केवळ ऐकून न घेता त्यावर विचार करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

काय बोलले होते शाह
‘काही दिवसापूर्वी अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी  एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यात त्यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केल होत .सध्या समाजात चहूबाजूने विष पेरलं गेलं आहे. या परिस्थितीत लवकर सुधारणा होईल असं वाटत नाही. त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता सतावत आहे,’ अशी भीती प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी व्यक्त केली होती . ‘उद्या माझ्या मुलांना जमावाने घेरलं आणि त्यांना तू हिंदू की मुसलमान असं विचारलं तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नसेल, त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता वाटतेय. कारण मी माझ्या मुलांना कधीच धार्मिक शिक्षण दिलं नाही. चांगलं आणि वाईटाचा धर्माशी काहीच संबंध नसतो,’ असं शहा यांनी म्हटलं आहे.या व्हिडिओत त्यांनी बुलंदशहर हिंसेचा उल्लेखही केला होता . एका पोलीस अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे गायीच्या मृत्यूला अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं सांगतानाच जे लोक कायदा हातात घेत आहेत, त्यांना शिक्षा ठोठावलीच पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होते .