बिहारमध्ये सत्ताबदल होणार, Exit Polls चा अंदाज ! भाजपात अस्वस्थता, मतमोजणीकडे देशाचे लक्ष

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये (Bihar Election 2020 ) सत्तांतर होण्याचे संकेत मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या (Exit Polls) अंदाजातून मिळाल्याने एनडीए, विशेषत: भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे आता मंगळवारी (दि.10) बिहारमध्ये होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

बिहारच्या रणसंग्रामात कोण बाजी मारणार याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे. राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला विजय मिळणार असल्याचे भाकित वर्तवण्यात येत आहे. नवनिर्वाचित आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप वा नितीश कुमार करतील, हे लक्षात घेऊन काँग्रेसने दोन वरिष्ठ नेत्यांना बिहारमध्ये पाठवले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सर्व जबाबदारी रणदीप सुरजेवाला व अविनाश पांडे यांनी पेलली. एक्झिट पोलनंतर दुसऱ्या दिवशी, रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार हे दोन्ही नेते पाटण्यात दाखल झाले आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएच्या प्रचार सभांना म्हणावी तितकी गर्दी नव्हती. नितीशकुमार यांची सत्ता जाऊन ती सूत्रे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीकडे येतील, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. दरम्यान, बिहारची जनता कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकते याची उत्सुकता सर्वांंनाच असून उद्या हे चित्र स्पष्ट होणार आहे.