गुप्त भेटीवरून उदय सामंत चांगलेच भडकले, म्हणाले – ‘दोनवेळा नाकारलेल्या राणेंनी आम्हाला शिकवू नये’

मुंबई, ता. २४ : पोलीसनामा ऑनलाइन – “आरोप कोण करतं यावर बरंच काही अवलंबून आहे. शिवाय २०० लोकांसोबत झालेली भेट गुप्त असत नाही. ज्यांना दोनवेळा जनतेनं नाकारले आहे. त्यांनी आमच्याबाबत गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली, असा दावा करणार्‍या निलेश राणे यांच्यावर सामंत यांनी यावेळी जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूमपर्यंत पोहचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसारमाध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी,’ असे ट्विट निलेश राणे यांनी केल्यानंतरच राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.

उदय सामंत याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, “तौउक्ते वादळाच्या नुकसानीमुळे मी रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौर्‍यावरर होतो. त्यावेळी मी रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात होतो. त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तेथे आले. आपल्या महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती आहे. फडणवीस हे सीनिअर लिडर आहेत, त्यामुळे जिल्ह्यात त्यांचे स्वागत करणे मला संयुक्तिक वाटले. त्यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह अनेक नेते होते. ज्यांनी हे ट्विट केले ते खूप मागे होते त्यामुळे त्यांची गफलत झाली असावी. शिवाय आमची गुप्त भेट झाली हे कोण सांगतं? तर ज्यांना दोनवेळा नाकारले त्यांनी हे सांगावे? हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कतीत बसत नाही भेट कुठे झाली कशी झाली, बंद खोलीत झाली का? हेही सांगावे. मुळात त्यांच्या या ट्विटची दखल मी का घ्यावी, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे.”

पुढे बोलताना सामंत म्हणाले, “मला जर भेट घ्यायचीच असती तर देशभरात अनेक शहरे आहेत तेथेही भेट झाली असती. माझ्याबाबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा गैरसमज व्हावा यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. अशा सदिच्छा भेटींचे राजकीय अर्थ जर लावणार असाल तर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी विचार करावा. ज्या राणेंची दखल जनतेने घेतली नाही त्यांची दखल मी का घ्यावी. असल्या ट्विटने माझे राजकीय करिअर थांबणार नाही. ऑपरेशन लोटस करण्याची काही गरज लागणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील आणि महाविकास आघाडी भक्कम राहील. शिवाय मुळात आरोप आणि दावा कोण करतो यावर बरेच काही अवलंबून आहे. ज्यांना दोन जिल्हे सांभाळता येत नाहीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलू नये.”