विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा व्यापक बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – यंदाच्यावर्षीही मागीलवर्षी प्रमाणेच गणेश विसर्जन मिरवणूक पार पडेल. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी शहरात व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून गुरूवारी सकाळपासून शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. नागरिकांनी उत्साहात आणि शांततेत गणेश विसर्जन मिरवणूक पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असावे आवाहन पोलिस आयुक्त के. वेकंटेशम यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

संभाजी पोलिस चौकीमध्ये आयोजित या पत्रकार परिषदेस सहपोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त  श्रीकांत तरवडे, वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. के. वेंकटेशम म्हणाले, की मानाच्या पाच मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक दरवर्षीच्याच वेळेत अर्थात सकाळी दहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू होईल.

प्रमुख विसर्जन मिरवणुकीतील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावर पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सेक्टरनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या मार्गावरील मिरवणुकीमध्ये ६०२ मंडई सहभागी होतात. याठिकाणी ३ हजार १३८ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार असून एसआरपीएफच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच या प्रमुख मार्गावर व्हिडीओ वॉल उभारण्यात येणार आहेत.

     या मार्गावरील मिरवणुकीवर २६९ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे वॉच ठेवण्यात येणार असून फरासखाना पोलिस ठाण्यामध्ये मुख्य कंट्रोल रूम असेल. गुरूवारी विसर्जनाच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बगाडे रोड, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रोड, केळकर रस्ता, गुरूनानक रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, नळ स्टॉप ते खंडोजीबाबा चौक दरम्यानचा कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक ते जेधे चौक रस्ता, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक आणि प्रभात रस्ता टप्प्याटप्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी या कालावधीत पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन डॉ. पंकज देशमुख यांनी यावेळी केले.

ढोल पथकांवर निर्बंध
ढोल पथकांमधील वादक आणि सहकारी असे १०० जणांचे पथकाला परवानगी देण्यात आली आहे. पथकात सहभाग असलेल्यांना पोलिसांचे पासेस बंधनकारक केले आहे. ढोल पथकांना शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मानाच्या मंडळासमोर अधिकाअधिक तीन तर अन्य मंडळांसमोर दोनच ढोल पथकांना परवानगी दिली असून त्यांनी नमूद केलेल्या चौकातच वादन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. एका मंडळामध्ये सहभागी झालेल्या ढोल पथकांना अन्य मंडळांत वादनाची परवानगी देण्यात येणार नाही, असे सह पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र शिसवे यांनी नमूद केले.

पोलिसांचा बंदोबस्त
विसर्जन मिरवणुकीसाठी  चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, १२ डीसीपी, २७ एसीपी, १५० पोलिस निरीक्षक, ४६१ उपनिरीक्षक, ७,४५७ पोलिस कर्मचारी, दोन एसआरपीएफच्या तुकड्या, १६ शीघ्र कृती दल, ७ बीडीडीएसच्या तुकड्या, ७०० होमगार्ड, ३० हजार स्वंयसेवक, निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी, एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी बंदोबस्तावर असतील.

Loading...
You might also like