Baramati News : MIDC चा भूखंड मिळविण्यासाठी तयार केले चक्क उद्योगमंत्री देसाईंचे बनावट पत्र, एकावर FIR दाखल

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती औद्योगिक वसाहातीमधील भूखंड मिळविण्यासाठी चक्क उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचे बनावट शिफारस पत्र करून शासनाची फसणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोहेल गुलमोहमंद शेख (बागवान) (रा. साहिल बंगला, बारामती क्लब रोड, बारामती) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सलिम फकिर महंमद बागवान (वय 55, रा. कचेरी रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. सोहेलने बारामती औद्योगिक वसाहतीमधील कटफळ येथील प्लॉट क्र. जी- 35 हा स्वत:च्या नावे होण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे बनावट शिफारस पत्र तयार केले. हा खोटा दस्तावेज स्वत:जवळ बाळगून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. गेल्यावर्षी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल शेख यांच्या सासऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. सोहेल व त्याच्या सासऱ्यातील वाद मिटविण्याकामी बागवानने पुढाकार घेतला होता. याकामी सोहेलने त्यांची भेट घेतली असता सासऱ्यांनी दिलेले पत्र सोहेल याला दाखविले. त्याने मूळ पत्र सादर करत उद्योगमंत्र्यांनी बारामती एमआयडीसीतील भूखंड माझ्या नावे होण्याची शिफारस केल्याचे सांगितले. सासऱ्यांनी सरकारी रक्कम न भरल्याने माझी शिफारस झाल्याचे तो म्हणाला. या पत्राविषयी फिर्यादी बागवान यांनी अधिक माहिती घेतली. यावेळी त्यावर 28 जून 2019 अशी तारीख असल्याचे आढळले. त्यावर फिर्यादीने बारामती व पुणे एमआयडीसी कार्यालयाकडे माहिती मागितली. परंतु, त्यांच्याकडे असे कोणतेही पत्र नसल्याचे दिसून आले. फिर्यादीने माहिती अधिकारात उद्योग व खणीकर्म मंत्रालयाकडे माहिती मागवली. त्यावेळी असे कोणतेही पत्र देसाई यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय यासंबंधी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्याला बनावट पत्रासंबंधी माहिती दिली होती. मात्र, संबंधित प्रकार बारामतीत घडल्याने तक्रार देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार फिर्याद देण्यात आली. बारामती शहर पोलीस तपास करत आहेत.