सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ! पेट्रोल, डिझेल, केरोसिनच्या दरात घट

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – पेट्रोल, डिझेल, केरोसिनच्या दरात झालेली घट आणि स्वयंपाक गॅसचे (एलपीजी) दर स्थिर ठेवण्यात सरकारला यश आले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्याभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटरमागे १ ते ३ रुपयांनी घट झाली आहे तसेच केरोसिनचा भाव सुद्धा १३ रुपयांनी घटला आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (आयओसी)च्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार डिझेलच्या किरकोळ विक्री किमतीत सप्टेंबरमध्ये २.९३ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ९७ पैशांनी घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. ऑक्टोबर महिन्यातही डिझेलच्या किमती १७ पैशांची घट झाली असून पेट्रोलचे भाव मात्र स्थिर आहेत. डिझेलच्या किमतीत घट झाल्याने मालवाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे. जुलै २०२० पासून घरगुती स्वयंपाक गॅसच्या दरात कोणताही बदल झाला नाही. पेट्रोलियम कंपन्यांकडून या काळात दरमहा सरासरी १३ कोटी सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे.

केरोसिनच्या मागणीत सातत्याने घट
रास्त धान्य दुकानांमार्फत वितरित केल्या जाणाऱ्या केरोसिनच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. केरोसिनच्या दरात लिटरमागे तब्बल १२.७३ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीस केरोसिनचे दर २.१९ रुपयांनी घटले आहे. केरोसिनचा प्रतिलिटर दर २५.८४ वरून २३.६५ रुपयापर्यंत घटला आहे. केरोसिनऐवजी एलपीजी वापरास प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे.यामुळे केरोसीनच्या मागणीत घट झाली आहे. हि घट सातत्याने होत असल्याने त्याच्या दरातसुद्धा घट झाली आहे असे इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.